आम्ही इतक्या दिवसांकरता अमेरीकेला जाणार म्हटल्यावरच बहिणींनी बोटावर बोटं ठेवायला सुरूवात केली. त्याचं कारण आमचं ट्रॅक रेकॉर्ड खरंच खराब होतं. कोणत्याही ठिकाणी १० दिवसांकरता जरी गेलो तरी ५-६ दिवसांत आम्हाला घरची आठवण येऊ लागते. कधीकधी तर ट्रिप प्रीपोन करून घरी आलोय. त्यामुळे त्यांचंही काही चुकलं नव्हतंच.
फेसबुकवर सध्या एक मेसेज फिरत आहे - खात असलेल्या फळांच्या बिया साठवून ठेवा आणि पावसाळ्यात कुठे फिरायला गेलात तर त्या आजूबाजूला टाका, निदान काही तरी रुजतील. तेवढाच पर्यावरण हरित करण्यास आपला हातभार.
कल्पना खरंच खूप छान आहे. सध्या आंबे, फणस, जांभळं वगैरेचे दिवस आहेतच. त्यामुळे या सगळ्या फळांच्या बिया एकत्र करून ठेवायला हरकत नाही. शिवाय ही खास आपल्या भूमीतील झाडं. मग ही झाडं रुजवायला थोडा अजून सजग हातभार लावता येईल का?
समजा प्रत्येकानं / किंवा एखाद्या गटानं मुद्दाम यंदाच्या पावसाळ्यात असा प्रयत्नपुर्वक उपक्रम हाती घेतला तर?