मन ओढ घेत राहतं सतत तुझ्याकडे...
डोळे स्वप्न-सत्यातला फरक ओळखेनासे होतात...
इतक्यांदा तू दिसतोस समोर ...
थेट समोर ....
अगदी जवळ...
श्वासांची ऊष्ण आंदोलनं जाणवतात मला ...
इतक्या समोर...
तुझ्या मिठीचा गंध दरवळत राहतो आसपास...
धुंदी चढतच राहते क्षणाक्षणाला...
या सगळ्या धुंद वेड्या भास-आभासांना पेलून शरीर थकतं हळू हळू!
ओढतं राहतं रोजच्या घाण्याच्या चकरा...
मन सैरभैर धावतं
अन शरीर घट्ट रुतून बसतं
संसारात,
जबाबदाऱ्यांत,
मुला बाळात...
आणि काय कायसमोर असेल त्यात.
निश्चल शरीर
आणि ओढाळ मन
ओढाताण नुसती अविरत!
बांधते मी रोज दावणीला हे वेड...
तट्कन् तुटणारे हे मन एके दिवशी
अंधाराला छेदून तू करशील ना साथ
सुटले सगळे हातून तू देशील ना हात
दोलायमान परिस्थितीत तू राहशील ना ठाम
दूर दूर राहिले सारे तू नाहीना लांब
बघ तू अन मी एकाच झोक्यावरचे श्वास
मागे तेव्हढेच पुढे अंतराचे तेव्हढे भास
उद्या आणि कालच्या मात्रांचा हा ताल
काळजाच्या ठेक्याची हिंदोलची चाल
कधी उंच कधी खाली आभाळ भुईवर
श्वास आणि निश्वास दोघे बसू झुल्यावर
बंगलोरच्या शाळांना मुख्य मोठी सुट्टी दसऱ्याचीच.. त्यामुळे 'ही सुट्टी कुठे' यावर खलबतं सुरु झाली.. 'महाग पण pre-planned/टेन्शन फ्री केसरी-वीणा की आपलं-आपण प्लॅन/एक्सप्लोर करत जरा अडव्हेंचरस स्वस्त-मस्त ट्रीप' हा आमचा मुख्य वादाचा मुद्दा असतोच! यंदा बापाला लेकाची पण साथ मिळाल्याने ते जिंकले आणि ठरलं, आपलं-आपणच जायचं - पॉंडेचेरीला! श्रीअरविंद आश्रम/ मातृमंदिरमुळे मला आणि बीचेस आणि खादाडीसाठी लेकाला उत्सुकता होती. तर नवऱ्याला तिथलं जुनं अजूनही टिकून असलेलं फ्रेंच कल्चर खुणावत होतं.
हलके हलके
होऊन पीस
बलून मध्ये मस्त बैस
वजनरहित तरल सैल
उंच अंतराळात जाईल
भरून श्वास खोल खोल
वरून पहा भूमी गोल
नाही गुरुत्वाचे आकर्षण
मी पणाचे कण कण
हरपेल मग नाव गाव
कोण कुठले तुम्ही राव
पक्षांची ओलांडून सुंदर नक्षी
निळेभोर आभाळ साक्षी
राजहंस उडणारे खास
लागेल तिथे चंद्राचा ध्यास
शीतल चांदण्या स्वागतास
कोजागिरीच्या जागरास
केशरप्याल्यात चंद्रामृत
शीतल धुके चांदण्यांचे दूत
अशी खास स्वप्नील पूनव
कोजगरती म्हणून जागव
माणूस ह्या जगात एकटा येतो आणि एकटाच जातो वगैरे वाक्यं आपण वर्षानुवर्षं वाचत आलेलो असतो किंवा प्रसंगोपात बोलून दाखवत असतो. अशी वाक्यं दुसर्यांची उदाहरणं देऊन बोलायला बरी वाटली तरी आपल्यावर हे उमजण्याची वेळ येऊ नये असंही आपल्याला कुठेतरी वाटत असतंच. तरीही जवळजवळ प्रत्येकाला आयुष्यात एखाद्या साक्षात्कारी क्षणी एकटेपणाच्या ह्या आदिम अनुभूतीचा प्रत्यय येतच असतो. आपले कुणी नाही, आपण एकटे पडलोय ही ती जाणीव ! भितीदायक असते ही जाणीव फार. एखाद्या चुकार क्षणी नुसती विजेसारखी लखलखून ती येत जात राहिली तर फारसे बिघडत नाही. उलट आपले पाय जमिनीवर ठेवायला त्या लख्ख जाणीवेची मदतच होते.
रोजचं जगणं धोपटमार्गावरून घरंगळत असत. सकाळच्या गजरापासून रात्रीच्या जांभईपर्यंत साधारणपणे सारखंच. ठराविक वयानंतर हे असच असणार, हे आपण कबूलही केलेलं असत. तीच नोकरी, तेच सहकारी, सरावाच झालेलं तेचतेच काम. घरीही तसंच. ठराविक रस्ता, त्यावरचे ठराविक सिग्नल. काही वाईट नसतं ह्यात. असं स्थैर्य मिळावं, म्हणून तर आपण जास्तीत जास्त शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय सुरू करतो. कौटुंबिक, आर्थिक स्थैर्य मिळालं, की स्वतःची पाठ थोपटून घेतो.
हाती बाळाच्या कपड्यांची,
दुधाच्या बाटल्यांची,
स्वतःच्या ऑफिसची व पाठीवर लॅपटॉपची,
पोटावर बेबी सॅकची,
मेंदूत कामाची,
मनात असंख्य विचारांची,
पायात अनंत अंतरांची,
गाडीत असीम वेगांची,
कसली कसली ओझी घेऊन भिरभिरलीस?
कसल्या कसल्या अस्थिरता,
पैशांच्या,
करिअरच्या,
घरकुलाच्या,
पिल्लाच्या,
घरच्या,
सगळ्या काळज्या गिळत,
काम करत राहिलीस....