उन्हाच्या झळा, आता तीव्र होऊ लागतात
कोकिळाला आपला सूर, बरोब्बर सापडू लागतो
आसमंतात आंब्याचा गंध, दरवळू लागतो
वाळक्या सुक्या फांद्यात, हिरवा रंग घुमू लागतो
अन रानातल्या झाडांमधून, "वसंत" पिंगा घालू लागतो
आभाळात काळे-निळे ढग, डोकावू लागतात
मधूनच वा-याच्या अंगात, वादळ घुमू लागते
भूमीची तृषा अजूनच, भेगाळत वाढत जाते
कोकिळाची लकेर, आता अधिकच तीव्र होऊ लागते
अन त्या तिथे, नैऋत्येकडून "ग्रीष्मा"ची चाहूल येऊ लागते
आता फुटतो, आवाज पेर्ते व्हा ला
शेता शेतात, लगबग वाढीस लागते
झाडांच्या निष्पर्ण टोकांना, उभारी येऊ लागते
अन आकाशातून जीवन, अक्षरशः कोसळू लागते
स्वागत
शिशिर सरता सरता सांगे वसंताशी
बर का नीट कर सृष्टीशी
अन बहरला कि रानी-वनी
पिका गानाची घाली मोहिनी
गुलमोहरा दिली लाल वसनं
बहावा वर लाविली पिवळी केतनं
मधुरा फळांची परीक्षिती कोण कोण?
रावे नि सारे खग गण
आली आली चैत्रगौर
नवरात्रीच्या तृतीयेस माहेरी
नवरात्रीत जागवा नवदुर्गा नि अंबिका
गालात हसली रेणुका
उधळा उधळा मोगरा न सुगंधी फुले
नि ती उधळील सुवर्णफुले
सौख्यासिंधू च्या लहरी या लहरी
स्पर्शल्या मनास, चढल्या शेखरी ...
दूर दूर चालतांना वाट काही दिसत नाही..
जीवघेण्या वाळवंटात साथ कुणाची मिळत नाही..
आधार घ्यावा कोणाचा हे माझं मलाच कळत नाही..
आणि रडू नये, हताश होऊ नये हे कळूनसुद्धा वळत नाही..
ज्यांनी या जगात आणले त्यांच्याशी नाळ कधी तुटली.. कळलंच नाही..
ज्यांचा हात हातात धरला त्यांना नक्की काय हवंय.. कळलंच नाही..
नक्की कोणासाठी हा आटापिटा.. कोणास ठाऊक..
नक्की काय मिळतंय यातून.. झुरण्याशिवाय.. कोणास ठाऊक..
खूप एकटं वाटतं तेव्हा वाटतं तू या जगात यावं..
काही न बोलता सुद्धा खूप काही बोलून जावं..
तुझ्यासाठी वाटतं जगावं आणि तुझ्यासाठी मरून जावं..
माझ्यासाठी तुझ्यासाठी.. तू माझ्या जगात यावं..
मनोगत
पावसाच्या सरीला चिंब भिजायचं आहे
लाटांना सागराचा तळ गाठायचा आहे
हातांना हातचं सोडायचं आहे
स्वप्नांना गाढ झोपायचं आहे
डोळ्यांना एकमेकांना भेटायचं आहे
चंद्र किरणांना खिडकीच बंद करायची आहे
लेखणीला पानांना फाडायचं आहे
विचारांना विचार करणे बंद करायचं आहे
रात्रीला काळरात बनायचं आहे
निद्रेस कायमचं ठाण मांडायचं आहे
शहाणपणास वेडे व्हायचं आहे
भक्तीला ज्ञान व वैराग्या शिवाय जगायचं आहे
विजया केळकर ___
कधी अचानक दिवस उगवतो
खूपच वेगळा अगदी वेगळा
त्याला रोजची घाई नसते
जाण्याची गती नसते
रेंगाळणाऱ्या वार्यासारख्या
तो थांबून थांबून चालतो
जुन्या पुराण्या आठवणीना
तो आठवत आठवत निघतो
सुखाबरोबर दुखाचीही गोष्ट निघते
मनातील कोपर्यामधील आठवणी उजळत
मधेच एखादी अनामिक हुरहूर दाटते
आणि अशातच संध्याकाळ होते
मन पुन्हा एकदा विचलत होते
पूर्णपणे घुसळून निघते
मग एखादी अशा मनामध्ये जागते
उरलेल्या आयुष्याला पुन्हा दिशा देते