हाती बाळाच्या कपड्यांची,
दुधाच्या बाटल्यांची,
स्वतःच्या ऑफिसची व पाठीवर लॅपटॉपची,
पोटावर बेबी सॅकची,
मेंदूत कामाची,
मनात असंख्य विचारांची,
पायात अनंत अंतरांची,
गाडीत असीम वेगांची,
कसली कसली ओझी घेऊन भिरभिरलीस?
कसल्या कसल्या अस्थिरता,
पैशांच्या,
करिअरच्या,
घरकुलाच्या,
पिल्लाच्या,
घरच्या,
सगळ्या काळज्या गिळत,
काम करत राहिलीस....
मन ओढ घेत राहतं सतत तुझ्याकडे...
डोळे स्वप्न-सत्यातला फरक ओळखेनासे होतात...
इतक्यांदा तू दिसतोस समोर ...
थेट समोर ....
अगदी जवळ...
श्वासांची ऊष्ण आंदोलनं जाणवतात मला ...
इतक्या समोर...
तुझ्या मिठीचा गंध दरवळत राहतो आसपास...
धुंदी चढतच राहते क्षणाक्षणाला...
या सगळ्या धुंद वेड्या भास-आभासांना पेलून शरीर थकतं हळू हळू!
ओढतं राहतं रोजच्या घाण्याच्या चकरा...
मन सैरभैर धावतं
अन शरीर घट्ट रुतून बसतं
संसारात,
जबाबदाऱ्यांत,
मुला बाळात...
आणि काय कायसमोर असेल त्यात.
निश्चल शरीर
आणि ओढाळ मन
ओढाताण नुसती अविरत!
बांधते मी रोज दावणीला हे वेड...
तट्कन् तुटणारे हे मन एके दिवशी
थेंब टपोरू लागतात
खिडकीच्या दुधाळ काचेवर..
ढगांच्या काजळमायेत
उगवते एक तेजस्वी शलाका.
दिसते एक डहाळी काडकन मोडताना
समोरच्या गुलमोहराची..
शेवटी येतेच घसरत जमिनीवर
तिच्या खुळखुुळणाऱ्या शेंगांसकट.
कानात जमा होतो तडतडणारा पाऊस
शेतावरल्या गोठ्याच्या पत्र्यावर..
हुंगता येते ताजी कोरी हवा
बिनचष्म्याच्या बदामी डोळ्यांनी.
गडद करकरीत ढगांचा लागत नाही ठाव
आणि समोर उभे रहाते एक हरवलेले गाव..
जाहल्या काही चुका अन् शब्द काही बोललेले
तू दिलेले दु:ख सारे, प्रेम म्हणूनि गाईले
प्रेम भरल्या त्या दिसांचा, आठव जागा आजही
एकटीने झेलते आघात सोयऱ्यांचे, कधीची
त्या क्षणांना साद घालीत, संसार सारा ओढिते
तू दिलेले दु:ख सारे, प्रेम म्हणूनि गाईले...
होईल सारे नीट अन, पार करेन भवसागरा
आशा ही लावुनिया हृदया, मी कधीची धावते
मी असे सर्वस्व माझे, तुलाच रे वाहिले
तू दिलेले दु:ख सारे, प्रेम म्हणूनि गाईले...