उभी कधीची यमुनातीरी
मध्यान सरली, उन्हे उतरली
शाम वेळ अन शाम न सोबती
धीर न उरला मनी जराही
हूरहूर, काहूर मनी दाटली
अंधारुनि आली सृष्टी सारी
शाम सखी मी, शाम सखी
दाट धुक्याने वाट अंधुकली
शिरशिरी उठली यमुने वरती
सोबत तिच्या मी आसुसलेली
पाठराखणीस कदंब सावली
पुऱ्या मिसळलो आम्ही तिघी
एकच तू, नयनी - हृदयीही
शाम सखी मी, शाम सखी
अवनी सारी गंधीत झाली
त्यात मिसळली धुंद पावरी
घेऊन तुझिया चाहूल आली
अंतर्बाह्य पुलकित झाली
राहिले न मी, मी माझी
तूच तू, झाले मी सारी
(मृ ने वापरला शब्द वेगळ्याच संदर्भात... त्याची कविता एक टिपी म्हणून तिथेच लिहिली. पण तो शब्द वेगळ्या अर्थाने मनात भिरभिरू लागला. अन मग ही उतरली मनातून खाली...)
तू म्हणालीस नजरेनेच
अन मी तुला जवळ खेचलं...
मनापासून हसलीस
अन लाजलीसही...
कित्तेक दिवस लोटले...
ना तू नजरेने काही बोललीस
अन मी ही नाहीच वाचले
तुझ्या अव्यक्त मनातले...
संपलीच का ग आपल्यातली
एकमेकांमधली,
ती हवी हवीशी
खेच...
जराजराशी सैल होऊ दे बोटांच्या गाठींची गुंफण..
जराजरासेे पुसून टाकू पाठीवरचे हलके गोंदण..
जराजराशी शांत होऊ दे कुंडलिनीची अलगद थरथर..
जराजरासे वाफ होऊ दे केसांवरचे गंधित दहिवर..
जराजरासा खुडून टाकू उरात भरला उनाड वारा..
जराजरासा उतरून देऊ देहावरचा मोरपिसारा..
जराजरासे हटव तुझे ते, पायांवरचे पाय आर्जवी.
जराजराशी फिकट होऊ दे ओठांवरची मोहमाधवी.
जराजरासे पुन्हा येऊ दे मला नियंत्रण श्वासांवरचे..
जराजरासा दृष्टीआड हो, राज्य त्यागुनि प्राणांवरचे..