कविता

चांदणी चौक

लाल चौकोनी दिव्यांची अखंड मोहनमाळ
चहूबाजूंनी कर्कश्श उतू जाणारा पाऊस
काचांवर, पत्र्यांवर, सिमेंटच्या मातीवर

भर पावसाळ्यात पानोपानी वठलेले एक झाड
कुजणाऱ्या गवताचा गोडूस, रानटी गंध
चांदणं हरवून बसलेला एक स्तब्ध चौक

विझलेली नजर आणि शिवशिवणारे हात,
चौकोनाच्या आत, चौकोनाच्या वर
रग लागलेल्या गर्दीचे उभे दमट पाय

समोर काचेच्या तड्यांत फुटलेला एक सूर्य
अचानक उतारातून टोळीने घसटणाऱ्या
गुबगुबीत मेंढ्या, प्रत्येकीवर एक लाल ठिपका

Keywords: 

कविता: 

तेजोमय मित्रा

*** तेजोमय मित्रा ***
कोवळी, कोमल हलकेच फिरवी नजर
तप्त,कृध्द, थेट सरळ नजर
तिरकी मान, धूसर कलती नजर
वळवशी मान, नजरेसमोर अंधार.....
तव दर्शनाविना होतसे घाबरी
सतत गिरकी घेत रहातसे सामोरी
तू असा जवळी रहा
तू असा जवळी रहा ......
अंतर राखून फिरते भोवती गरगरा
मंतरलेली मी साहते ऋतुचक्राचा मारा
तुज असे काय ठावं-----
कितेक फिरती तुजभवती
मज नाही त्याची तमा
मज ऐसे ठावं ------
मी एकलीच त्यात तुझी प्रियतमा
या सुखास लागलं गिर्‍हाण (ग्रहण )
मजभोवती गोंडा घालणारा त्यास कारण
देवा ऐक माझं गार्‍हाणं

कविता: 

सांगाती

मी एकटी नाही
तो आहे सोबतीला.
कधीकधी वाटतं तो निघून गेला, कायमचा.
पण तो उडत येतो पुन्हा
एखाद्या काळोख्या पहाटे किंवा टळटळीत दुपारी
किंवा श्वास कोंडून टाकणाऱ्या संध्याकाळच्या सावल्यांत.
सगळ्यांना नकोसा एक पक्षी
माझं दुःख, वेदनेचा पक्षी.
त्याच्या बंद गळ्यातून कधीच निघत नाही सूर
फक्त झुलत रहातो माझ्या धमनीच्या हिंदोळ्यावर.

- माझा आवडता कवी-लेखक चार्ल्स बुकोवस्कीच्या companion कवितेवर आधारित.

Keywords: 

कविता: 

विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल

अरे देवा विठ्ठला
निघाला निघाला
पायी चालला
वारकरी।।
उभा वाटेवरी
घेऊन भाकरी
करीन चाकरी
क्षणभरी ।।
भक्त मज सम
मुखी तव नाम
राहू नको लांब
जवळी ये ।।
पालखी सोहळा
पाहू निज डोळा
भेटेल सावळा
भाव भोळा ।।
गर्दी वाळवंटी
आस एक गाठी
होवो तुझी भेटी
विठूराया ।।
मिटूनिया डोळे
नजरा नजर
चालला गजर
जय हरी ।।
विठ्ठल विठ्ठल........

विजया केळकर ______

कविता: 

अनुप्रास

सरधोपट सरळसोट
नाजूक बांधा मोठे पोट
आटपा चटचट विना कटकट
पांढरी साडी काळा कोट
श्वासोच्छवास ,भास-आभास
करून घ्या मोकार त्रास
नवी साथ नवी आस
मांडव बाजार -भ्रमनिरास
हा असाच रोजचाच भोगा जगण्याचा अनुप्रास

सोमवारच्या निळाईस ,
सप्रेम

कविता: 

आठवण

आठवण
( आईच्या स्मृतीदिना निमित्त ----- )

कधीच नाही ऐकिले तिचे गायिलेले गाणे
सतत आठवते ऐकिलेले स्तोत्र-पठण

अन्नपूर्णा प्रसन्न,कुशल सुगरण
पदार्थ चविष्ट, असो पुरण वा शिकरण

सुबक रांगोळी करून सडा-सारवण
पक्ष्यांस दाणा आणि नेमे गोग्रास घालणं

प्रपंच नेटका,टापटीपीचं शिवण
प्रसंगी काटकसर आणि गणित शिकवणं

दैवत राम-कृष्ण, ऐकावे वेळोवेळी भागवत पुराण
न चुके कार्तिकस्नान,श्रावणमासी 'सत्यनारायण'

म्हणावे आवडीने आठवले की भजन
जय जय राम कृष्ण हरि,नामस्मरण

तिच्या लुगड्यांची गोधडी उशाशी असणं
प्रेमळ स्पर्शसुख व उबदार पांघरूण .......येते आठवण....

कविता: 

मना रे मना

मना रे मना

मना रे मना, का तुला कळेना
हितगुज श्वासांचे

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
रानमाळ वार्‍याचे..

कधी येणार रे साजणा
कशी साहू मी विरहवेणा

सुटी पाकळी, झुरते वेळी
बंध ओल्या पापण्यांचे
मना रे मना...

सांज शिंपित दूर थवे
नभी रंगती नित्य नवे

दूर किनारी, चांद रूपेरी
स्वप्न झुले माडांचे
मना रे मना...

कुठे रूजतील रे चांदण्या
लेण्या सजतील रे गोंदण्या

ओल्या पागोळ्या, श्रावण वेळा
गुपित मनमोराचे
मना रे मना..

झणी गंधाळली चांदणी,
प्रीतमोहरल्या या मनी

Keywords: 

कविता: 

माऊली

माऊली
माझ्या माऊलीची ओवी
डोळे मिटायला लावी
सारी स्वप्ने पूरी व्हावी
अमृतफळे चाखावी

माये शिकवी गणित
सारे हिशोब ओठात
कधी समजे पाठीत
माझे घडवी भाकीत

माझ्या माऊलीचा श्वास
सदा भासे आसपास
दिसे विठोबा भक्तास
घेई परीक्षा दुर्वास

माझ्या माऊलीची आण
होण्या विजयाची खाण
घेई कष्टाचेच वाण
गाते गोडवीचे गाणं

माझ्या माऊलीचे हात
भरवती दाल-भात
शिकवती रीत-भात
बहुगुणी जीवनात

विजया केळकर________

कविता: 

दरवळ...

मोहनाने आज परत त्याच्या मोहात बांधून घेतलं....
बेसावध क्षणी मोगऱ्याचा दरवळ बनून आला अन श्वासाश्वासात भिनला श्रीरंगाचा गहिरा ध्यास.....
ओंजळ भरून घेतली त्या गंधित चांदण्यांनी....
अलगद सोडून घेतली बोटं त्या अलवार क्षणातून ..
अन पसरल्या त्या चांदण्या उशीवर...
आता स्वप्नही होईल गंधित... तरल....
अन जाणिवा विरघळून जातील श्यामल निर्मोही नेणिवेत..

-कल्याणी

कविता: 

गाणं

गाणं..

हृदयाला घट्ट बिलगून आहे एक गाणं..

एका एका श्वासाने भरत जातो अंतरा,
थोडा चंद्र, थोडा सूर्य की चांदण्यांच्या मात्रा..

फुलपाखरी पंख घेऊन भुर्र फिरून येते,
मनातल्या चोराला मोकाट सोडून देते!

कुठंकुठं खण्ण वाजते अनुभूतीचं नाणं..
चढ्या लयीत गाऊन घेत्ये मिठीतलं गाणं!

खोल खोलश्या विहीरीतून आलेत सूरपक्षी
गीत शिंपीत तुळशीपाशी तुझ्या रांगोळीची नक्षी..

एक सूर पारव्याचा, एक जीवनगाणं..
जुन्या गोधडीच्या मऊ पोतीचं आहे रेशीमगाणं...

Keywords: 

कविता: 

पाने

Subscribe to कविता
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle