काल whatsapp वर एक कविता वाचली.. तिला प्रतिसाद द्यायचा, म्हणून लिहायला लागले, तर मी जे लिहीलं तेच कवितेसदृश झालं. मैत्रिणी, नातेवाईकांना सहज म्हणून शेअर केलं, अनपेक्षितपणे मला त्यावर खूप छान प्रतिसाद मिळाले, म्हणून आज मैत्रीणवरच्या मैत्रिणींसोबत शेअर करत आहे.
सरत्या पावसात, काही डबकी साचलेली.
घनगर्द अरण्य मी चाचपडत आहे..
रंगीबेरंगी पक्षांची भरघोस विण.
दुधी आवाज, आकाशाच्या पार जाणारा.
एक झरा टणक कातळाला टोचा मारत आहे..
गुळगुळीत गोटे अंतर्बाह्य हलतात.
त्यांच्या मुलायम, दगडी त्वचेवरचा शहारा.
वाऱ्याचा एक मजबूत हेलकावा
आणि सूर्य शिवण उसवून ओघळतो,
लांबचलांब पसरलेल्या शेतांमध्ये.
आता शेकडो योजने दिसतील मला
माझ्या मिचमिच्या पापण्यांमधून..
उनाड वाऱ्याची हळूच कुजबुज,
"माहितीये? उजेडाची नशा माझ्यात असती,
तर मी अक्खा समुद्र भरला असता
या फुलत्या कमलिनीच्या पोटी..
वेड्या!
इतकं दिलदार आणि दिलफेक असू नये रे माणसाने!