एक झण्ण आहे माझ्या गाभ्यात.
तो बाहेरचं फार काही आत झिरपू देत नाही.
तो ग्लानी तुटू देत नाही.
आत येणारी कुठलीही संवेदना तो नाकारतो.
लिखित शब्द, चित्रित कथा
कशातही अडकू देत नाही.
'ते करायचंय ना? यात काय वेळ घालवतेस?'
ज्यात त्यात हेच टोकत राहतो तो.
मी कशातच अडकू शकत नाही.
मी कशातच थांबू शकत नाही.
मी थांबून काहीच करू शकत नाही.
मी गुंगीतच असते.
डोळ्यासमोर चालू असतात
माझ्या गाभ्याला स्पर्शही न करू शकणाऱ्या कहाण्या,
अविरत दळले जाणारे विनोद,
याच्या त्याच्या नावाची अवतरणे,
गुंगी तुटत नाही.
माझ्या आत काही झिरपत नाही.
त्याच्या तिच्या माझ्या दुःखाने
उन्मळून, कोसळून पडू देत नाही.
उगवलेल्या प्रत्येक दिवशी मी गोळा करते...
हाती लागतील तेवढे सारे गडद फिके रंग
इथून तिथून जमा केलेले काही आकार-उकार
आणि डोळ्यांत ओतायला थोडे भाव थोडी झिंग
पण रोज उठून मीच बनवलेलं माझंच शिल्प वेगळं दिसतं
संध्याकाळपर्यंत अनोळखी वाटू लागतं
त्यात मला माझं रूप काही केल्या आढळत नाही
मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!
मीच माझं सगळं असणं कागदावर लिहून काढते
शब्दा शब्दांत न मावणारं रिकाम्या जागांत पेरून ठेवते
लिहिलेल्याचे सारे ओघळ पानभर विद्रूप होतात
कवितेखालची माझी सही केविलवाणी पुसून जातात
माझीच भाषा नंतर मला वाचता येईनाशी होते
अगम्यातच व्यक्त होणं माझं काही टळत नाही
बस मध्ये खिडकीच्या जवळ
तेच तेच विचार कातरवेळी
वाऱ्याचा स्पर्श मनाला स्पर्शून
केसांची बट सावरत
बस चालली पुढे
मन मात्र माझे मागे
असेच एकदा बाजूला बसलास तू
स्पर्शाने खुप काही बोललास
अजून काही तरी बोल
असे वाटताना
तुझा स्टॉप आला
तुझा तो एक कटाक्ष
माझे हृदयातून तुला पाहताना
आज ही आठवते ती कातरवेळ
सुखाचा शोध घेताना
मला खुप काही सापडले
जे मी शोधत होते
ते मी प्रत्येक्षात पहिले
बाळ जेवलीस का आईचा स्वर
पैसे आहेत ना तुझ्याकडे बाबांची हाक
तुला काहीतरी सांगायचे आहे भावाची तळमळ
स्वतःला सांभाळ आजीची साद
खुप दिवसाने भेटल्यावर मैत्रिणीने मारलेली मिठी
तब्बेत बारी नसताना काळजी करणारी मुलगी
खुप थकलेली असताना नवऱ्याने फिरवलेला डोक्यवरून हाथ
खरंच अनुभवत होती मी सुख
आणि थांबवला सुखाचा शोध