आपला परिसर परका होतो.
सगळं माहितीचं.
ओळखीचं काहीच नाही,
कुणीच नाही.
ही सुरुवात असते बाजूला पडण्याची, तुटण्याची.
आधी जागा नाकारते.
मग माणसे नाकारतात.
मग परिसर नाकारतो.
मी अगतिक.
धुंडाळते जुन्या जगाचे जुने कोपरे.
माझा नाईलाज नेत राहतो मला जुन्या वाटांकडे.
आता इथे थारा नाही.
इमारती, माणसे, गाड्या
सगळ्या गर्दीने कधीच फेकून दिलेय मला.
आता शहरातल्या प्रत्येक क्षणी हे शहर मला नाकारते.
माझे त्याचे नाते नाकारते, ओळख नाकारते,
तात्पुरता आसराही नाकारते.
शहराने हे फार पटकन अंगवळणी पाडून घेतलेय.
पाऊस बरसुनी गेला अन आठवणींच्या सरी उलगडल्या,
सर मोत्याचा तुटुनी मोती सरसर गळावे, तश्या आठवणी मनभर ओघळल्या.
काहींनी मन झाले रेशीम रेशीम
हासू त्या गाली देऊन गेल्या,
काहींनी गिरवला त्या मोहकवेळा
जसा साजनच परत बिलगूनी गेला.
एखादा दिवस उगवतोच सुस्तावल्यागत.
का उगवतो?
का सुस्तावतो?
मनातच मळभ दाटलय तर
घसाघस अंग धुऊन काय व्हायचं?
का साचतय मनात हल्ली येवढं,
धुकं, धूर, गाळ, माती,
अश्रू, सल, पानं, फुलं, पक्षी?
सगळंच सांगावं वाटत नाही
काही लिहावं वाटत नाही
तरी पेन टेकला कागदावर की
शब्द झरत जातात
ओढ नसल्या झऱ्यासारखे
नि गढूळतात वाहणं विसरुन.
साचू नका बाबांनो
एकतर वाहत रहा जीथे मन मानेल
नाहीतर जिरून तरी जा मातीत
काय माहीत कोणत्या वेदनेचं मूळ
शेकडो मैल प्रवास करत
माती खाली शोधत असेल ओल.