"माझ्या प्रेमात.." ती स्वतःशीच पुटपुटली "आणि मी त्याला निघून जायला सांगितलं, कायमचं" पुढच्याच क्षणी रडक्या चेहऱ्याने नुपूराकडे बघत ती कसंबसं म्हणाली.
नुपुरा तिच्या तोंडाकडे बघतच राहिली. "अगं काय, काय चाललंय हे नक्की? हे कधी झालं? आत्ता इथे? " तिचे प्रश्न थांबतच नव्हते. "का केलंस तू असं?" तिचे हात घट्ट धरत नुपूराने विचारलं.
"मी आंधळी झाले होते, मला वाटलं-" पुढे तिला बोलायची गरजच नव्हती. तिला काय वाटलं ते नुपूरापर्यंत व्यवस्थित पोहोचलं होतं.
तिला पटापट सगळं आठवत गेलं. त्याने अवंतिका आणि त्या सगळ्या भूतकाळाबद्दल तर सांगितलं पण हल्ली त्याचं जे नुपूराबरोबर सुरू होतं त्याचं काय. ते तर त्याने तिला बरोब्बर गंडवून लपवून ठेवलं होतं. आंधळेपणाने ती नुपूराला कशी काय विसरली?
त्याला नुपूराशी अफेअर करायचंय हे तिला माहीत आहे, हे त्याला तेव्हाच माहिती होतं. म्हणूनच त्याने मुद्दाम तिचा वापर करून नुपूराला रोखण्यापासून थांबवलं. आणि हा पूर्ण वेळ त्या दोघांचं अफेअर सुरू होतं! शिट!!
आज गर्दी, उत्साही आरडाओरड, हशा आणि चविष्ट खाण्यापिण्याने 'ला बेला विता' गजबजून गेले होते. प्रत्येक टेबल खचाखच भरलेले होते. सभोवतालचा उत्साह बघून बेलाच्या चेहऱ्यावरचे हसू कमीच होत नव्हते. नुपूराची 'ला बेला'मध्ये वेगवेगळ्या आर्टिस्ट्सचे गिग अरेंज करायची आयडिया खरंच कमाल होती. सगळी तिकिटं दोन दिवसातच सोल्ड आउट होती. आजची रात्र अजूनच खास होती कारण आज पहिला ऍक्ट असीमचा होता. आज आणि पुढचे सलग सहा दिवस! तो पूर्ण आठवडा इथे असणार होता. गेल्या चार महिन्यात चुटपूट लावत, घाईघाईत झालेल्या फक्त तीन भेटी तिला आठवत होत्या. त्यामानाने हा अख्खा आठवडा एकत्र म्हणजे तिच्यासाठी अगदी स्वर्गासमान होता.
"फायनली पाऊस थांबलेला दिसतोय." ती पडदा सरकवत म्हणाली. साडेपाचच्या अलार्मने जागी होऊन ती खिडकीत उभी होती. बाहेर अजूनही अंधार, थोडंसं धुकं आणि साठलेलं पाणी टपटपणारं रेन ट्री अंधुक दिसत होतं. काल त्याने बाबांना कॉल केल्यानंतरचे तास कसे गेले हे तिला पैज लावूनही सांगता आलं नसतं. अखंड बडबड, त्यांचं एकमेकांत गुंतून जाणं आणि रात्री कधीतरी एक दोन वाजता भुकेची जाणीव होऊन फ्रिजवर टाकलेली रेड. नक्की काय खाल्लं तेही तिला आठवत नव्हतं पण बहुतेक फ्रीजमध्ये चीज क्यूब्स, काकडी, टोमॅटो, उरलेला ब्लॅक फॉरेस्टचा तुकडा, फ्रीझरमध्ये अडीनडीला ठेवलेलं चॉकलेट चिप आईस्क्रीम एवढंच असावं.
"जाताना मला कार वल्हवत न्यावी लागेल असं दिसतंय." तो तोंड वाकडं करत म्हणाला. "उद्या संध्याकाळपर्यंत मला परत पणजीला पोहोचायचं आहे. शो कॅन्सल झाला तर हेवी पेनल्टी बसेल."
त्याने पुढे येऊन तिच्या हातातले मग्ज घेत सेंटर टेबलवर ठेवले.
"बापरे, किती एकटं वाटत असेल असं नेहमी फिरत रहायला" ती सोफ्यावर बसता बसता म्हणसली.
"एकटं? विशेष नाही. एकटा तर मी हे शहर सोडून गेलो तेव्हा होतो." तो तिच्या नजरेला नजर मिळवत म्हणाला.
"हूं, बरोबर आहे. तुला कोणी एकटं सोडतच नसेल ना.." ती तिच्या मगमध्ये हळूच पुटपुटली.
"व्हॉट इज दॅट सपोज्ड टू मीन?" त्याने पटदिशी विचारलं.
गेले दोन आठवडे पाऊस उसंतच घेत नव्हता. धरण भरून, सगळे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले होते, तरीही वादळी पावसाची संततधार सुरूच होती. हायवेला दरड कोसळून वाहनांची रांगच रांग लागली होती. बेलाच्या आई-बाबांनीही पावसामुळे त्यांचं येणं कॅन्सल करून टाकलं. बेला सकाळपासून टीव्हीच्या लोकल चॅनलवर मेन रोडवर पाणी भरल्याच्या बातम्या बघत होती. 'ला बेला'च्या आजूबाजूला पाणी भरलं होतंच. तिने लगेच सगळ्या स्टाफला फोन करून सुट्टी दिली.
सोमवारची उदास सकाळ सोबतीला तुफान पाऊस घेऊन आली होती. खिडकीबाहेर नुसता करड्या धुक्यासारखा पाऊस दुमदुमत होता. बेला तिच्या केबिनमध्ये बसून समोर स्क्रीनवर टॅलीमधल्या आठवड्याच्या एंट्रीज चेक करत होती. टेबलभर सगळीकडे बिल्स, रिसीट्स आणि हिशोबांचे कागद पसरलेले होते. पण तिचं डोकं अजिबात चालत नव्हतं. काही टोटल अजिबात जुळत नव्हत्या. तिने चष्मा काढून टेबलावर ठेवला आणि खिडकीच्या पावसाने धुरकट झालेल्या काचेतून बाहेर पहात हातातली पेन्सिल चावायला लागली.
"बेला, माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे" धाडकन उत्साहाने आत येत नुपुरा म्हणाली.