विक्रम दिवाण! उंच, भारदस्त व्यक्तिमत्व. समोरच्या माणसाचा वेध घेणारे हिरवट घारे डोळे, अगदी असीमसारखेच! पण असीमसारखी चमक आता त्या डोळ्यांत उरली नव्हती. झुकलेले खांदे, दमलेला सुरकुतलेला पण अजूनही जुन्या दिवसांची आठवण करून देणारा देखणा चेहरा आणि विरळ झालेले केस अश्या रूपात त्यांना पाहून तिला वाईट वाटलं. कितीतरी वर्षांनी बघत होती ती त्यांना. चेहराही आता बराच मवाळ झाल्यासारखा दिसत होता, नाहीतर लहानपणी त्यांच्या रागाच्या किश्श्यानी पेपरचे गॉसिप कॉलम्स भरलेले असत.
"ओह, तुझं घर इथून जवळ आहे हे विसरलेच होते मी. गुलमोहर पार्कमध्ये ना? तुझे बाबा राहतात अजून तिथे?" ती किल्ल्याच्या भिंतीचा आडोसा बघून टेकून उभी रहात म्हणाली.
"हम्म, मी गेल्या बारा वर्षात त्यांना भेटलो नाहीये." तो तिच्याशेजारी भिंतीला टेकून हाताची घडी घालून समोर बघत म्हणाला. तिने घाबरून त्याचा मूड बदलला तर नाही म्हणून त्याच्याकडे पाहिलं, पण तो शांत होता. "त्यांना माहीतही नसेल आत्ता मी आठवडाभर इथे आहे ते."
"पण एखादा शो बघायला तरी आले असतील नक्की! मी 'ला बेला' उघडलं तेव्हा माझी अख्खी फॅमिली आली होती सेलिब्रेट करायला.." ती म्हणाली.
तो निघून गेल्यापासून तिची द्विधा मनस्थिती झाली होती. एकीकडे तिला नुपूराला त्याच्यापासून लांब ठेवायचं होतं पण त्याच्यासारख्या चिडक्या, अग्रेसिव्ह आणि संशयास्पद कॅरॅक्टरच्या माणसाबरोबर तिला एक अख्खा दिवस घालवायला नकोसंही वाटत होती. तिला फक्त एक खात्री झाली होती की तो नुपूर किंवा ती कुणाही एकीबरोबर दिवस घालवणार होता म्हणजे त्याला फक्त नुपुरामध्ये खास इंटरेस्ट नव्हता. त्याने ही ऑफर फक्त तिला आपला कंट्रोल सिद्ध करायलासुद्धा दिली असेल, उद्या तो येईलच कशावरून? पण त्याच्या स्पर्शाने, जवळीकीने तिच्याआत जी ठिणगी पडली होती ती काही विझण्याचं नाव घेत नव्हती, उलट आग पसरतच चालली होती.
त्याच्या इतक्या जवळ गेल्याची जाणीव तिला काही वेळाने झाली तेव्हा त्याच्या अंगाची ऊब, त्याच्या जॅकेटचा थोडा लेदरी, थोडा वूडी गंध आणि त्याच्या डबलमिंटचा रिफ्रेशिंग वास तिच्या नाकात शिरला. त्याच्या उष्ण श्वासांची आवर्तने तिच्या केसांमध्ये तिला जाणवत होती. तिने डोळे मिटून त्याच्या छातीवर डोके टेकले पण हे पुढे कुठे जाणार ते लक्षात येऊन ती मुद्दाम हळूच ओह.. निखिल, स्टॉप इट.. म्हणून कुजबुजली. अचानक अंगावर पाल पडल्यासारखं त्याने तिला मिठीतून ढकलून बाजूला केलं. पुन्हा मघासारखेच त्याचे डोळे थंड रागाने तिच्यावर रोखलेले होते. ओठ मुडपून त्यांची एक सरळ रेष झाली होती.
आज दुसरा कुठलाही दिवस असता तर कदाचित हा माणूस बेलाच्या इतका डोक्यात गेला नसता आणि तो कोण आहे हे माहीत असतं तर त्याच्यापासून ती चार काय, आठ पावलं लांबच राहिली असती पण... पण तिला ते माहीत नव्हतं आणि आजचा सोमवार असा होता की मंडे ब्लूज ही फारच सॉफ्ट टर्म झाली. आख्खा लंच अवर म्हणजे डोक्याला शॉट झाला होता.
एन्व्हलप बघून तिला धक्काच बसला. आता मला चिट्ठी लिहिण्यासारखं काय आहे आमच्यात? का ही माणसं जवळीक करायला बघतात उगाच? की हा अजूनही जाईल तिथे असाच बायकांवर चान्स मारत असतो देव जाणे.. एकदा तिच्या मनात तसंच एन्व्हलप फाडून कचऱ्यात टाकायचा विचारही आला पण तिच्यातल्या उत्सुकतेने त्याच्यावर मात केली. असून असं काय असणार त्यात, बॉंब तर नक्कीच नसेल. विचार थांबवत शांतपणे तिने एन्व्हलप उघडलं. आत पांढरी शुभ्र, गोलाकार आणि वर निळ्या शाईत 'White Elite' मोनोग्राम असलेली दोन तिकिटे!
'Asymmetric'
by A. Diwan
tuesday - thursday - saturday
तिची पाठ वळताक्षणीच तो आपलं जास्तच निरीक्षण करतोय असं तिला जाणवलं म्हणून तिने चालता चालता सहज मागे वळून पाहिले. आता त्याचा गॉगल टेबलवर होता आणि त्याचे हिरवट घारे डोळे तिच्यावर रोखलेले होते आणि चेहऱ्यावर वेगळेच काहीतरी भाव होते जे प्रयत्न करूनही तिला उमगत नव्हते. त्याची नजर तर शांत, थंड होती पण त्या एखाद्या हिरवट शेवाळलेल्या डोहासारख्या शांत डोळ्यांमागे प्रचंड खळबळ दडलेली आहे असं तिला वाटू लागलं. ती पटकन मान फिरवून रिसेप्शनमधल्या तिच्या खुर्चीवर जाऊन बसली.