जर्मन आणि जर्मनी हे दोन वेगळे शब्द आहेत हेच मूळात अनेकांना माहीत नसतं. तर जर्मनी हा देश आहे आणि त्यांची जर्मन ही भाषा आहे. याच जर्मन भाषेला मूळ भाषेत दॉइच (Deutsch) हा शब्द आहे तर जर्मनीला दॉइचलांड (Deutschland) हा शब्द आहे. या लेखात जर्मनीतल्या वास्तव्यातला भाषा शिकण्याचा प्रवास, अनुभव, भाषा येत असण्याचे बरे वाइट परिणाम, बदलत गेलेला दृष्टीकोन, भाषा अंगवळणी पडण्याचा प्रवास याबद्दल.
पंचवीस डिसेंबरची सुट्टी यापलीकडे लहानपणी कधीच नाताळशी फार संबंध आला नाही. जपानला गेले तेव्हा विमानतळावर अगदी सिनेमात पाहिल्यासारखं सजलेलं ते ख्रिसमस ट्री प्रत्यक्ष बघून एक फोटो काढला होता. जर्मनीत आल्यापासून तर ख्रिसमस आणि त्याआधीपासूनची दिसणारी तयारी सगळं जवळून अनुभवलं, त्यातही खास जर्मन लोकांच्या परंपरा समजत गेल्या. गणपती, दिवाळीसोबतच ख्रिसमसच्या पण दर वर्षीच्या आठवणी आता जमा झाल्या.
बाहेर खाण्याच्या बाबतीत अनिवासी भारतीयांमध्ये दोन प्रकारचे लोक दिसतात, एक ज्यांना इथेही बाहेर रेस्टॉरंट मध्ये भारतीय जेवण आवडतं आणि दुसरे ज्यांना ते आवडत नाही. जे इथे बाहेर भारतीय नको असे म्हणणारे असतात, त्यांची कारणं वेगवेगळी असू शकतात. कुणी म्हणतात की घरी ते खातोच, पुन्हा बाहेर काय तेच? कुणी म्हणतात की इथे भारतीय म्हणजे फक्त पंजाबी, त्याच चवी सगळीकडे त्यापेक्षा ते नको, किंवा अजून काही आपापली कारणं असू शकतात. तर काहींना भारतीय पदार्थ आवडतात म्हणून, घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून तिथे जायला आवडतं.
२०१५- २०१६ हे वर्ष ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक आदरणीय वि. वि. पेंडसे (आप्पा पेंडसे) यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आप्पांनी सुरु केलेल्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मी माजी विद्यार्थिनी. ह्या विशेष स्मृती वर्षात आपल्याला काय करता येईल असा विचार करताना प्रशालेतील पाचवी ते दहावी मधल्या वर्षांच्या आठवणी लिहून काढाव्यात अशी कल्पना मनात आली. दरम्यान मायबोलीवर शाळेच्या आठवणींचा एक धागा सुरु झाला आणि आठवणी लिहून काढायला निमित्त मिळाले! तिथे लिहिलेल्या आठवणी एकत्रित स्वरुपात राहाव्यात म्हणून इथे प्रसिद्ध करत आहे.
फार म्हणजेच फारच उशीराने, मे-जून मध्ये केलेल्या भारताच्या ट्रिप बद्दल आता पाच महिने होऊन गेल्यावर अखेरीस त्याबद्दल पोस्ट करायला सुरुवात करते आहे.
ही बरीचशी दैनंदिनी आहे, थोडं प्रवास वर्णन आहे, भारतातल्या तीन चार आठवड्यांच्या वास्तव्यात दिसणारे, जाणवणारे बदल, येणारे अनुभव, त्याबद्दलचे जरा विचार असं सगळंच आहे. अनेक वर्ष भारता बाहेर राहून प्रत्येक भारतवारी वेळी अनेक बदल दिसतात, कळत नकळत दोन्हीकडची तुलना पण होत असते. काही व्यक्तिगत बाबी तर काही माझ्यासारख्या अनेकांना अश्या वेळी जाणवत असतील अश्या गोष्टी.
आलीच की दहावी! प्रबोधिनीतली सहा वर्षे चढत्या भाजणीची वाटतात मला. त्यामुळे दहावीचं वर्ष सगळ्यात खास आणि खूप लक्षात राहिलेलं आहे. नववी आणि दहावी आम्ही एकाच वर्गात (वर्गखोली) होतो. त्यामुळे कदाचित नववी ते दहावी हे transition देखील जाणवलं नाही. आमच्या पंचनदीच्या शिबिराची एक गम्मत म्हणजे हे शिबीर झालं २६ मार्च ते ३० मार्च ह्या कालावधीत आणि आमच्या वार्षिक परीक्षा होत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात! म्हणजे नववीच्या वार्षिक परीक्षेच्या एक आठवडा आधी आम्ही सगळा अभ्यास सोडून कोकणात शिबिराला गेलो होतो. आमच्या सुदैवाने पालकांना आणि शाळेला ह्यात आमचे “शैक्षणिक नुकसान” होण्याची भीती वाटली नाही.
नववीच्या खूप आठवणी आहेत पण एक आठवण आहे जी सगळ्या आठवणींपेक्षा सर्वात जास्ती ठळक आणि लाडकी आहे आम्हा सगळ्यांचीच! म्हणून मी ती सगळ्यात शेवटी सांगणार आहे!
आठवीत चारुता ताई आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यांच्याबरोबर आम्ही वर्षभर एक वेगळा उपक्रम राबवला! महिन्यातले एकाआड एक शनिवार वर्गातल्या चौघी जणी दुपारची शाळा सुटल्यावर ताईंबरोबर त्यांच्या घरी जायचो. तिथे अख्खी दुपार घालवायची आणि मग संध्याकाळी घरी परत जायचं! ह्या दुपारच्या वेळात आम्ही काहीतरी कलाकारी करायचो आणि शिवाय एखादी कमी कटकटीची पाककृती बनवायचो. ह्याशिवाय ताईंशी आणि त्यांच्या घरच्यांशी अखंड गप्पा असायच्याच! अशाप्रकारे आम्ही सगळ्या जणी त्या एका वर्षात ताईंच्या घरी जाऊन आलो. हा खरंच खूप छान उपक्रम होता. आता वाटतं की ताईंनी केवढी मोठी commitment केली होती आमच्यासाठी!